… म्हणून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भूमिका भारतीय संघराज्याला धोकादायक

पुणे :  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या उभारणीत गांधी-नेहरू आणि काँग्रेसचे योगदान मोठे आहे. याच काँग्रेसने देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक विकासाची पायाभरणी केलेली आहे. आज काही लोक गांधी-नेहरू आणि काँग्रेसमुक्त भारत अशी भूमिका मांडत आहेत. ही भूमिका भारतीय संघराज्याला धोका निर्माण करणारी आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व गांधीवादी विचारवंत अरुण खोरे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वतीने आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि देशाच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान’ या विषयावर खोरे बोलत होते. प्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

अरुण खोरे म्हणाले,  धर्मनिरपेक्ष विचारातून गरीब आणि शेवटच्या घटकातील माणसाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले. देशाला दुर्बल करणाऱ्या धार्मिक, पंथीय, जातीय शक्ती सक्रिय झाल्याचे सध्याचे वातावरण आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत गांधी-नेहरूंचे विचार आपण अभ्यासले पाहिजेत. हाच विचार आज तारक ठरणार आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी भंपक, हिंसक मांडणी काही लोक करत आहेत. मात्र, लोकशाही, भारतीय संविधान संरक्षित करण्यासाठी काँग्रेसची नितांत गरज आहे. त्यामुळे देशातील सामान्य माणूस, शिक्षक व जाणकारांनी काँग्रेसचे योगदान, विचार समजून घेत भारतीय संघराज्याचे स्थान अबाधित राखावे.

मोहन जोशी म्हणाले,  स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे नेतृत्व काँग्रेसने केले. या ७५ वर्षांच्या वाटचालीत काँग्रेसने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. धोरणात्मक, दूरदृष्टीने निर्णय घेत पंडित नेहरूंनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली. इंदिरा गांधींनी भारताची शक्ती दाखवून दिली. तर एकविसाव्या शतकातील भारताचे स्वप्न दाखवण्याचे काम राजीव गांधी यांनी केले. त्यामुळे काँग्रेसचे योगदान कितीही झाकण्याचा प्रयत्न केला. तरी तो ठळकपणे दिसल्याशिवाय राहणार नाही.

विद्यमान सरकार काँग्रेसने केलेल्या विकासाची री ओढत असल्याचे सांगत प्रसाद आबनावे यांनी देशाच्या विकासातील काँग्रेसचे योगदान अधोरेखित करणारे काही प्रसंग विशद केले. कल्याणी साळुंके यांनी प्रास्ताविक केले. विभा आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. पुष्कर आबनावे यांनी आभार मानले.