भारतीय नागरिक म्हणून मोदी सरकारची लाज वाटते; विश्वंभर चौधरींचा पारा चढला

Pune – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने त्यांना पक्षात येण्याचा संदेश दिला असून तसे केल्यास त्यांच्यावरील सर्व खटले बंद करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांनी गुजरात दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच हा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, मला भाजपचा संदेश मिळाला आहे – आप तोडून भाजपमध्ये जा, सीबीआय ईडीचे सर्व खटले बंद होतील. भाजपला माझे उत्तर – मी राजपूत आहे, महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी माझे डोके कापून टाकेन. पण मी भ्रष्ट-कारस्थानांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी भाष्य केले आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, मनिष सिसोदियांनी दावा केला आहे की असा मेसेज त्यांना आलाय की आप सोडून भाजपात आल्यास सीबीआयच्या सगळ्या केसेस गुंडाळून टाकू! केंद्राच्या गुंडगिरीची हद्द झाली असून भारतीय नागरिक म्हणून मोदी सरकारची लाज वाटते. असं चौधरी यांनी म्हटले आहे.