एका मंत्र्याकडे आठ-आठ जिल्हे असल्यामुळे मोठी अडचण, मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना 

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अनेकांनी पाण्यात देव ठेवलेत. त्यात आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार का, हे पाहावे लागेल. त्यांनी भाजपमुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bacchu Kadu), आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागलेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने आपली यादी तयार ठेवली असल्याचे समजते.

दुसऱ्या बाजूला एका मंत्र्याकडे आठ-आठ जिल्हे असल्यामुळे मोठी अडचण होत आहे, त्यामुळे कामाला गती येत नाही. हा विस्तार जनतेसाठी होईल, कुणाला मंत्रिपद मिळावं, यासाठी नाही. कोणाला मंत्रिपद देता हे महत्त्वाचं नाही, मात्र विस्तार महत्त्वाचा आहे. मी दिव्यांग विकास मंत्रालय मागितलं आहे, ते मिळेल अशी पूर्ण अपेक्षा मला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शब्दाखाली जाणार नाहीत, याची मला खात्री आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.