Muralidhar Mohol | पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा

केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मोहोळ यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर २४ तासांच्या आत पुण्याशी निगडित तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढला. शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी अनेक दिवस प्रलंबित असलेले पुण्याचे नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भातील प्रश्न मांडले. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शाह यांनी तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मोहोळ यांना दिले.

याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून आवश्यक असलेल्या आणि गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.’

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शाह यांच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळालेल्या या निधीतून शहरभर विविध कामे केली जाणार आहेत. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मुद्दा बैठकीत मांडला असता त्यावरही शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी वर्ग केला जाईल, असे सांगितले’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like