महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच देशमुखांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. नुकताच देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, व्हायरल झाल्लेल्या व्हिडीओमध्ये संबंधित नेत्याने आपली फसवणूक केल्याचे एक महिला सांगत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे देशमुख यांनी सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आता त्या नेत्याचा थेट बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. (solapur BJP leader’s bedroom video’s viral)

या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन या नेत्याचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, देशमुख यांनी महिलेवर हनीट्रॅपचा आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.