मुंबई पोलीसांना बदनाम करुन बंगल्यावरचे ‘कांचा’ करायचे काय? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई –  महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे बेकायदेशीर, अनधिकृत, अर्तक, बालिश, पोरकट असून कधी नव्हे तेवढे मुंबई पोलीसांना बदनाम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. पोलीसांना बदनाम करुन त्यांना आपल्या बंगल्यावरील ‘कांचा’ करायाचे आहे काय? असा खरमरीत सवाल करित भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार (Ashish Shelar)  यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तक्रारदारांना आतापर्यंत असुरक्षित केले जात होते. आता बेआब्रु केले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम ठाकरे सरकार करित आहे. अशी टिकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणा-या शिवसेनेच्या पदाधिका-यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी दिव्या ढोले (Divya Dhole) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल तर घेण्यात आली नाहीच उलटपक्षी दिव्या ढोले यांचे अश्लील लज्जास्पद आणि बेआब्रु करणारे मोर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिव्या ढोले यांना देण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार केली त्याचीही दखल घेऊन न्याय मिळत नाही. म्हणून या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आवाहनही केले आहे. त्याला प्रितसाद न मिळाल्याने या प्रकरणी आज भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिव्या ढोले यांच्यावरील झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती माध्यमांसमोर उघड केली.

यावेळी आमदार अॅड.आशिष शेलार म्हणाले की, राज्यात सीआरपीसी, आयपीसी अस्तित्वात आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. उच्च विद्या विभुषीत दलित समाजासाठी काम करणा-या भाजपा पदाधिकारी दिव्या ढोले यांनी केलेल्या तक्रारीची दखल तर घेतली नाही उलटपक्षी अज्ञातांकडून त्यांनाच बेअब्रु करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्याची तक्रार केल्यावरही जर या राज्यातील पोलीस आणि सरकार दखल घेणार नसेल तर सीआरपीसी आणि आयपीसी कुठे आहेत ? तक्रारदाराला ज्या पध्दतीने बेआब्रु केले जाते त्या संशयाची सुई सत्ताधिकारी पक्षाकडे असून या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यात यावी. सदर महिला पदाधिका-याला न्याय द्यायचा असेल तर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी करणे आवश्यक असताना अशी चौकशी का केली जात नाही ? पोलीस असंवेदनशील का वागत आहेत आणि कुणाच्या सुचनेवरुन वागत आहेत? या घटनेमुळे एका महिलेची बदनामी होत नाही तर ठाकरे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेषीवर टांगली जात आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ठाकरे सरकार, सरकार पक्षातील नेते यांच्याविषयी कोणी कोणतेही भाष्य केले तर त्यांच्यावर अजामिनीपात्र गुन्हा, कारावास, हल्ले केले जातात आणि पंतप्रधान अथवा देशाचे गृहमंत्री आणि हिंदू समाज यांच्यावर टिका केली तर मात्र अदखलपात्र गुन्हा, सुटका, समर्थन केले जाते. म्हणजे मुख्यमंत्र्यांवर बोललात तर कारावास आणि पंतप्रधानाच्या विरोधात बोललात तर सत्कार असा कारभार राज्यात सुरु असून हा एकूण कारभार बेकायदेशीर, बालीश, पोरखट असल्याची टिका आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केली आणि तातडीने दिव्या ढोले यांच्या दोन्ही तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली. राज्यातील महिला आयोगही याबाबत निपक्ष वागताना दिसत नाही त्यामुळे हे प्रकरण पुन्हा केंद्रिय आयोगाकडे गेले की, कोल्हे कुई करु नका असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

बैठकीचे इतिवृत्त जाहिर करा

ओबीसी आरक्षणाशिवाय मुंबई महापालिकेची आरक्षणे जाहिर झाली असली तरी भाजपा ओबीसीच्या बाजूने आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी ओबीसी आरक्षणासहित फेर आरक्षणे टाकण्याबाबत बैठक घेतली. याबाबतची माहिती भाजपाने उघड केल्यानंतर या विषयासाठी अशी बैठक झाली नाही असे आयुक्त सांगत असतील तर मग त्यांनी झालेल्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतिवृत्त जाहिर करावे अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

सद्सद विवेक बुध्दीला स्मरुन आमदारांनी मतदान करावे

राज्यसभा निवडणूकीत भाजपाचे तिन्ही उमेदवार विजयी होतील याबाबतचा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे आमच्या मनात कोणतीही शंका नाही. भाजपा घोडेबाजार करित नाहीत व करणार नाही. आम्ही सर्व आमदारांना आवाहन करतो की, आपल्या सद्सद विवेक बुध्दीला साक्ष ठेऊन मतदान करावे. आमच्या तिस-या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तिस-या उमेदवाराला मतदान करणा-यांवर कारवाई होऊ शकत नाही. उरला प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा, संजय राऊत यांना तरी माहिती आहे का ? त्यांना त्यांच्या पक्षातील किती आमदार मतदान करणार आहेत ? भाजपाच्या दोन उमेदवारांना आवश्यक असलेला मतांचा कोटा दिल्यानंतर सुध्दा मूळ पक्षाची २२ मते शिल्लक राहतात शिवाय भाजप समर्थक अपक्ष एवढा मतांचा कोटा भाजपाकडे आहे. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे तर शिवसेनेतील एका उमेदवाराला आवश्यक असलेली मते जाऊन केवळ १३ मते शिल्लक राहतात. मुळ पक्षाची त्यांची अत्यल्प मते असताना त्यांनी उमेदवार उभा केला. जर संजय राऊत यांना त्यानाच किती मते मिळणार हेच त्यांना माहिती नसेल तर त्यांनी अन्य पक्षांच्या आमदाराविषयी बोलू नये ? संजय राऊत स्वतः घाबरलेले आहेत. त्यातून ते काही वक्तव्य करित आहेत अशी टिका आमदार आशिष शेलार यांनी इलेक्ट्राॅनिक माध्यमांच्या प्रतिंनिधीनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केली.