‘विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालं’

नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

दरम्यान, या विजयानंतर भाजपनेते आशिष शेलार यांनी खोचक प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला डिवचले आहे. ते म्हणाले, नागपूर,अकोला निवडणूकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय! मुंबईत,धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं! विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं!! मा.देवेंद्रजी आणि चंद्रकांतदांदाचे अभिनंदन! असं शेलार म्हणाले.