मंत्र्याला अशापद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे; अशोक चव्हाणांची टीका

 मुंबई –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.

टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.  दरम्यान,  नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन केले.

यावेळी सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरु झाले आहे. मंत्र्याला अशापद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जातोय.