काँग्रेस पक्षामुळे कोरोना पसरला तर जागतिक महामारी भारतात आलीच कशी? चव्हाणांचा मोदींना सवाल

मुंबई : राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. त्यावेळी त्यांनी देशभरात कोरोना पसरवण्यात महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष जबाबदार असल्याची टीका केली. यावरून कॉंग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कोरोनासंदर्भात काँग्रेसवर केलेले आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि निखालस खोटे असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्षामुळे कोरोना पसरला, असा आरोप केंद्र सरकार करत असेल तर मग ही जागतिक महामारी भारतात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार कोण? याचीही उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. असा सवाल ही अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

ते पुढे म्हणाले की, वाहनाची सोय नसल्याने हजारो लोकांनी मुलाबाळांसह पायीच प्रवास सुरू केला होता. ही असुविधा टाळण्यासाठी मजुरांना आपआपल्या राज्यात सुखरुप परत जाता यावे, यासाठी काँग्रेस व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. ही वस्तुस्थिती असताना पंतप्रधानांनी काही राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे विधान केले असण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे पद हे संवैधानिक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे त्यांच्याकडून असे विधान अपेक्षित नाही.

कोरोनाच्या गंभीर काळात लॉकडाऊन असताना कॉंग्रेसने मजूरांना फुकट तिकीट वाटली. त्यांना परराज्यात जाणं भाग पाडलं. यावेळी काहींनी रेल्वेने तर काहींनी पायी चालत आपले घर गाठलं. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती.