दंगली पेटवणाऱ्या सर्वधर्मीय नेत्यांना विचारा तुमच्या सर्वोच्च नेत्यांची मुलं कुठे आहेत? – विश्वंभर चौधरी

Pune – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची (Kolhapur ) हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी केलं आहे. जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

एका बाजूला प्रशासन शांतता राखण्याचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप काही थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, दंगली पेटवणाऱ्या सर्वधर्मीय नेत्यांना विचारा तुमच्या सर्वोच्च नेत्यांची मुलं कुठे आहेत? उन्हात रस्त्यावर दगड घेऊन आहेत की परदेशात वातानुकूलित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत?

 

 

धर्माचा ठेका तुम्ही गोरगरीबांनी घेतलाय. त्यांना तुमच्या बिनडोकपणाच्या जीवावर आर्थिक ठेके घ्यायचे आहेत. स्वतःची संपत्ती वाढवायची आहे, तुम्ही बसा तुरूंगात खडी फोडत. असं म्हणत विश्वंभर चौधरी यांनी आपली भूमिका मांडली आहे.