Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वाट्याला फक्त ‘इतक्या’ जागा

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहेत. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार. त्यामुळे शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाकडे 50 आमदारांचं बळ असतानाही त्यांची केवळ 48 जागांवर बोळवण केली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.