डोंबिवली बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांना रामदास आठवले यांनी केली 1 लाखांची मदत

मुंबई – डोंबिवली मधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली. डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन येथे ही भेट झाली. यावेळी अत्याचार पीडित मुलीचे  आई  वडिलांच्या हाती एक लाख रुपयांचा बेरर चेक देण्यात आला. त्यांचे डोंबिवलीत भाड्याने घर होते त्या घरात आता पुन्हा आम्हाला जाता येत नाही. अत्याचार पीडित मुलीची लहान बहीण इयत्ता 4 थी मध्ये शिकत असून अत्याचार पीडित मुलीच्या सर्व कुटुंबियांची जीवाला धोका आहे.त्यामुळे राज्य सरकार तर्फे पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे. अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

मुंबईत साकिनाका येथे अत्याचाराची घटना घडल्या नंतर त्यातील पीडितेच्या परिवाराला  मुख्यमंत्र्यांनी 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्या प्रमाणे डोंबिवलीतील  बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकार ने 20 लाखांची  सांत्वनपर मदत देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी  चौरे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, रिपाइं जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, दयाळ बहादूर, डी एम मामा चव्हाण, अण्णा रोकडे, घनश्याम चिरणकर, मीना साळवे, रामा कांबळे व भारत सोनवणे आदी अनेक  उपस्थित होते.

डोंबिवली सामूहिक अत्याचाराचा खटला जलद गती न्यायालयात चालवून 6 महिन्यात निकाल लावून आरोपीना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी यावेळी केली. डोंबिवली बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 33 आरोपीना अटक केली. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी असण्याचा हा प्रकार देशात पाहिल्यांदाच घडला आहे.  हे बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक असून रिपाइं च्या वतीने या प्रकरणाचा  रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध रामदास आठवले यांनी यावेळी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास काम करून  चांगली  कामगिरी केल्याबद्दल रिपाइं तर्फे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.