मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; राज ठाकरे भेटीसाठी दाखल

Sandeep Deshpande : मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande )यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे आदी नेते त्यांच्या भेटीसाठी आले. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. मात्र रुग्णालयातून बाहेर येताना ते व्हिलचेअरवर होते.

संदीप देशपांडे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते नगरसेवक देखील होते. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.