‘परमवीर सिंहांना परदेशी पळण्यास केंद्र सरकारने मदत केली असा खोटा आरोप करणारे काँग्रेस वाले कुठे गेले?‘

मुंबई – परमवीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले, त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमवीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचे वक्तव्य भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तब्बल 261 दिवस फरार असताना सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही? त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने का केली नाही? परमवीर सिंह यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही? याचे कारण म्हणजे ‘त्या अनिल वर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही‘, अशा ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप‘ संवादातून शिवसेनेने हे सर्व नाटक चालविले आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेता त्याची निःपक्ष चौकशी व्हावी याकरिता तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणी सुध्दा आ. भातखळकर यांनी यावेळी केली.

तसेच, आपल्या पापाची फळे कायमच भाजपा व केंद्र सरकारच्या माथी मारणाऱ्या कॉंग्रेसवाल्यांनी परमवीर सिंह यांना केंद्र सरकारने परदेशी पळून जाण्यात व फरार करण्यात मदत केली असा खोटा आरोप केला होता, परंतु परमवीर सिंह हे इतके दिवस भारतातच होते व काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्याच्या राजधानीत चंदिगड मध्ये होते हे आता सिद्ध झाले आहे. एकीकडे आपण ज्या पक्षासोबत सत्तेत भागीदार आहोत तोच पक्ष परमवीर सिंह यांना वाचवित होता हे माहीत असताना सुध्दा त्याबद्दल चकार शब्द काढायचे नाही आणि दुसरीकडे मात्र मोदी द्वेषातून केंद्र सरकारवर नाहक व खोटे आरोप करायचे हा काँग्रेसचा ढोंगीपणा आता उघड झाले असल्याची टीका सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी केली.

https://www.youtube.com/watch?v=NASO9VaKgfg

You May Also Like