इंदोर कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची WTC Final मध्ये धडक, टीम इंडियापुढील अडचणी वाढल्या

इंदोर येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) ९ विकेट्सने जिंकत ४ सामन्यांच्या बॉर्डर गावसकर सिरीजमध्ये पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गोलंदाजीत शानदार प्रदर्शन करत तिसऱ्याच दिवशी भारताला पराभूत केले आणि मालिका २-१ वर आणली आहे.

या पराभवासह भारताच्या कसोटी मालिका विजयासह कोणताही परिणाम झाला नाही. मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताच्या समस्या वाढल्या आहेत. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचे सरासरी गुण ६८.५२ इतके झाले असून त्यांनी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुसरीकडे भारतीय संघ मात्र या शर्यतीत मागे पडला (WTC Final Scenario) आहे. आता भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अहमदाबाद येथे होणारा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकणे गरजेचे आहे. हा सामना ९ मार्चपासून सुरू होणार आहे.