शाहू कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार प्रदान..

कागल – येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे हस्ते प्रदान करणेत आला. कारखान्याच्या वतीने अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांचेसोबत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, जेष्ठ संचालक कर्नाटक राज्याचे माजी मंत्री विरकुमार पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर मंत्री अजय लालजी ,राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील आरोग्य मंत्री राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को- अॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेने श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास हंगाम 2020-21 साठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्याचे वितरण आज नवी दिल्ली येथे झाले.

शाहू साखर कारखान्यास आजअखेर मिळालेला हा ६४ वा पुरस्कार आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील 23 तर राज्य पातळीवरील 41 पुरस्काराचा समावेश आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आज अखेर मिळालेल्या पुरस्काराचा तपशील खालील प्रमाणे-

सर्वोत्कृष्ट साखर कारखाना-४ उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना- ११ तांत्रिक कार्यक्षमता-२२ उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन -९ उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन -९ उत्कृष्ट डिस्टीलरी व्यवस्थापन-१ जास्तीत जास्त साखर निर्यात -२, प्रशंसा प्रशस्तीपत्र – १ इतर पुरस्कार -५ एकूण ६४ .

हा पुरस्कार स्व.विक्रमसिंह घाटगे यांना अर्पण – समरजितसिंह घाटगे

याबाबत प्रतिक्रिया देताना अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवणेसाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे ,तसेच कारखान्याच्या सभासद ,शेतकऱ्यांनी विश्‍वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड ,याचा हा गौरव आहे. सहकारी संचालक मंडळ ,सभासद,शेतकरी,कर्मचारी,पुरवठादार यांच्यावतीने हा पुरस्कार स्व.राजे विक्रमसिंह घाटगे याना अर्पण करतो.त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेनेच शाहू व्यवस्थापन व प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. सांघिक कामगिरीमुळेच ‘शाहू’चा हा नावलौकिक टिकवू शकलो किंबहुना त्यामध्ये भर घालू शकलो याचा मला अभिमान आहे.