Pathaan Controversy : शाहरुखच्या ‘पठाण’ला विरोध वाढला; अहमदाबादमध्ये बजरंग दलाकडून मॉलमध्ये तोडफोड

मुंबई – शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाबाबत वाद सुरूच आहे. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाच्या ऑरेंज कलरच्या बिकिनीवर काहींना आक्षेप आहे. दरम्यान, अहमदाबादमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते पठाण चित्रपटाच्या निषेधार्थ मॉलमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत.

न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते पठाण चित्रपटाच्या प्रमोशनला विरोध करत आहेत. गळ्यात भगवे स्कार्फ बांधून काही लोक थिएटरमध्ये तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच ते जय श्री रामचा नारा देत आहेत. मात्र, यादरम्यान मॉलमधील काही कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान अॅक्शन अवतारात दिसला आहे. याशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमची झलकही पाहायला मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.