नुपूर शर्मा यांना बजरंग दलाचा पाठींबा; देशव्यापी निदर्शने करण्याची केली घोषणा 

नवी दिल्ली- भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद सुरु असताना आता बजरंग दलाने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. बजरंग दलाने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या समर्थनार्थ देशातील अनेक भागात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिल्ली-उत्तर प्रदेशसह देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत. यासोबतच ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देशभरात वाढत्या कट्टरतावादाच्या घटनांबाबत निवेदनही सादर करणार आहेत.

गेल्या आठवड्यात मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक हिंसक घटना घडल्या. आता विश्व हिंदू परिषद (VHP) बजरंग दलाच्या युवा शाखेने वाढत्या जिहादी अतिरेकाविरोधात पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. विहिंपने एका निवेदनात म्हटले आहे की, बजरंग दल 16 जून रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयावर धरणे आणि निदर्शने करणार आहे.

नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना आता एक प्रकारे बजरंग दलाचा पाठिंबा मिळाला आहे. दोन्ही नेत्यांना मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान बजरंग दलाने आज देशातील अनेक भागात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. जिहादी अतिरेक्यांनी मशिदींमधून केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा निषेध करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. ते हिंसकपणे हिंदूंना लक्ष्य करत आहेत आणि त्यांची घरे जाळत आहेत. जमाव ओळखून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जिहादी अतिरेक्यांकडून हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते राष्ट्रपतींना निवेदनही देणार आहेत.