सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील – सुप्रिया सुळे 

पारनेर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा गट विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा गट असा संघर्ष सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता नेमकी शिवसेना कोणाची व धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत तर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ही लढाई दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालते, मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेला मुलगा आणि नातू का चालत नाही?, असा सवाल सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी केला आहे.

सुळे म्हणाल्या, की तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरे घर करा. तुम्हालाही शुभेच्छा. मात्र, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणे चुकीचे आहे. शरद पवार यांच्यावर ज्यावेळी काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळी साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढला. मात्र, काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसे माझी आहेत, असे कधी म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील.