‘बळीराजाने आज सिद्ध केलं, मोडेन पण वाकणार नाही… दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी “बळीराजानी सिद्ध केलं, ‘मोडेन पण वाकणार नाही’… ‘दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’…” अशा आशयाचे ट्विट करत शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे.

तर, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे, तर मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन!! शेतकऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षापुढे मोदी सरकार आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांना आज माघार घ्यावी लागली. भारतीयांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे,जर आपण एकत्रपणे लढलो तरच भाजपच्या फॅसिस्ट सरकारपासून लोकशाही वाचवता येईल’ अस विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.