नवीन मदरशांना अनुदानावर बंदी; योगी सरकारचा निर्णय

लखनौ – उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने नवीन मदरशांना कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात ५५८ मदरशांना शासकीय अनुदान दिले जात आहे.

योगी सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे . जर मदरसा सर्व निकष पूर्ण करत असेल तर अनुदान द्यायला काय हरकत आहे, असा त्यांचा सवाल आहे.ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष खर्‍या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवत आहे. आता शिक्षणातही द्वेषाचे राजकारण करायचे आहे. मदरसा दर्जा पूर्ण करत असेल तर अनुदान द्यायला काय हरकत आहे? मदरशातूनही डॉक्टर-इंजिनीअर घडवायचे असतील, तर असा भेदभाव करताना ते कसे शक्य आहे. ही सरकारची जबाबदारी आहे की मदरसा जर दर्जा पूर्ण करत असेल तर तुम्ही मदत करावी कारण भारतातील मुलेही तिथे शिकतात.

मदरशाचे व्यवस्थापक अब्दुल्ला म्हणाले की, मदरशांमध्ये केवळ कुराण, हदीस आणि उर्दू शिकवले जात नाही. तेथे हिंदी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे सर्व शिक्षण दिले जाते. सरकार असे करत असेल तर एका हातात संगणक आणि एका हातात कुराण असे का म्हणाले होते, असा सवाल पंतप्रधानांना केला पाहिजे.