उत्तर प्रदेशात रॅलीवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला; अलाहाबाद उच्च न्यायालयाचं मोदींना आवाहन

अलाहाबाद – ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश हायकोर्टात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टातील गर्दी पाहून कोर्टाने मोदींना हे आवाहन केले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोर्टाने म्हटले आहे की, निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा असे मतही नोंदवले आहे.

दरम्यान, या खंडपीठाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, विशाल लोकसंख्या असलेल्या या देशात पंतप्रधानांनी लसीकरण अभियान जोमाने चालवले आहे. कोर्ट याचे कौतुक करत आहे. त्याचबरोबर हायकोर्ट ठोस पावले उचलून प्रचासभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचेही आवाहन करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोर्टाने जीव आहे तर जग आहे, असेही म्हटले आहे.

दरम्यान, देशात काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 7 हजार 495 नवबाधीतांची नोंद झाली. तर 6 हजार 960 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे 434 रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली.