बँक ऑफ बडोदाने कर्जे महाग केली; जाणून घ्या नेमका काय होणार परिणाम

Bank Of Baroda Hikes Rates : नवीन वर्षातही महागड्या कर्जाची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदाने कर्जे महाग केली आहेत. बँकेने आपल्या MCLR च्या व्याजदरात म्हणजेच मार्जिन कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्जामध्ये 35 बेस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला.

बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) एक वर्षाचा MCLR 8.30 टक्क्यांवरून 8.50 टक्के केला आहे. ओव्हरनाइट MCLR 7.5 टक्क्यांवरून 7.85 टक्के करण्यात आला आहे. एक महिन्याचा MCLR 7.95 टक्क्यांवरून 8.15 टक्के, आणि 3 महिन्यांचा MCLR 8.06 टक्क्यांवरून 8.15 टक्के आणि 6 महिन्यांचा MCLR 8.25 टक्क्यांवरून 8.35 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच यापुढे बँका या दरापेक्षा कमी कर्ज देणार नाहीत.

बँक ऑफ बडोदाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय रिटेलपासून कॉर्पोरेट आणि एसएमईपर्यंत सर्वांनाच प्रभावित करेल. या वाढीनंतर MCLR आधारित कर्जे महाग होतील. ज्यांचे गृहकर्ज सुरू आहे त्यांची ईएमआय (EMI) महाग होणार आहे. एसबीआय आणि अॅक्सिस बँकेनेही डिसेंबर महिन्यात MCLR वाढवला आहे. डिसेंबरमध्ये SBI ने व्याजदर 15 बेसिस पॉईंटने आणि अॅक्सिस बँकेने 30 बेसिस पॉइंटने महाग केले आहेत.

डिसेंबर २०२२ मध्ये आरबीआयने रेपो दरात पाचव्यांदा वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने (RBI) डिसेंबरमध्ये रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर बँका सतत कर्ज महाग करत आहेत. 2022 मध्ये RBI ने रेपो दरात पाच वेळा वाढ केली आहे. या पाच टप्प्यांमध्ये रेपो दर 4 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला.