पडद्यामागचे सूत्रधार : भारताच्या ‘आय.एन.एस. विक्रांत’ला कोणी वाचवलं असेल तर ती होती सेहमत खान

विनीत वर्तक – ‘आय.एन.एस. विक्रांत’ युद्धनौका भारतासाठी अतिशय महत्वाची होती. १६,००० टन पाण्याचं विस्थापन करणारी, २१० मीटर लांब आणि २२,००० किलोमीटरचं अंतर कापण्यास सक्षम असलेली युद्धनौका शत्रूच्या रडारवर सगळ्यांत अग्रणी होती. १९७१च्या युद्धात ‘आय.एन.एस. विक्रांत’ने गाजवलेला पराक्रम पाकिस्तानच्या जिव्हारी लागलेला होता. त्यामुळेच ‘आय.एन.एस. विक्रांत’ पाकिस्तानच्या डोळ्यांत खुपत होती. भारताच्या युद्धनौकेला जर नुकसान केलं तर आपल्या जखमांवर कुठेतरी थोडी फुंकर घातली जाईल, अशी आशा पाकिस्तानला वाटत होती. त्याचसाठी ‘आय.एन.एस. विक्रांत’ला पाण्यात डुबवण्याची योजना करून भारताला जखमी करण्याची व्यूहरचना पाकिस्तान आखत होता. पण त्याच्या गावीही नव्हते, की भारताची पडद्यामागची एक सूत्रधार त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार आहे.

१९७१च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी भारताच्या रॉ ने अनेक गुप्तचर पाकिस्तानमध्ये पेरले होते. त्यात होती एक ‘सेहमत खान'(हे नाव तिच्यावर पुस्तक लिहीणाऱ्या हरिंदर सिक्का यांनी ठेवलं आहे. तिचं खरं नाव अजूनही भारतीयांपासून गुप्त ठेवलं गेलं आहे) सेहमत खान एक काश्मिरी मुसलमान मुलगी होती. तिच्या वडिलांचा काश्मीरमध्ये खूप मोठा व्यवसाय होता. तिच्या वडिलांनी तिला १९७१च्या वेळी भारतासाठी अशी कामगिरी करण्यासाठी उद्युक्त केलं. काश्मिरी मुसलमान असूनही तिच्या वडिलांना भारताचा प्रचंड आदर होता आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या मुलीला देशासाठी जीवाची बाजी लावायला सांगताना मागेपुढे बघितलं नाही. सेहमत खानच्या अंगात देशभक्तीचं बाळकडू आपल्या वडिलांप्रमाणे होतं. वडिलांच्या आदेशानंतर तिने एका पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीशी लग्न करून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. तिथून ती भारताच्या रॉ (Research and Analysis Wing) ला अतिशय महत्वाचे धागेदोरे १९७१च्या युद्धावेळी कळवत राहिली. पाकिस्तानातील परिस्थितीबद्दल जुजबी माहिती देणं इतकंच काम तिचं होतं. पण सेहमत जरी आता पाकिस्तानात असली तरी भारताचा तिरंगा तिच्या मनात नेहमीच फडकत होता.

१९७१च्या त्या काळात सेहमत खानला पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती याहा खान यांच्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी नेमलं गेलं. भारताच्या रॉ ची गुप्तहेर असणारी सेहमत खान पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या घरात जाऊन पोहोचली, तरीसुद्धा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना याचा काहीच सुगावा लागला नव्हता. सेहमत खान एक साधी एजंट असल्याने ती कदाचित रडारवर नव्हती. तिला पाकिस्तानच्या भारताचा बदला घेण्यासाठी शिजवत असलेल्या प्लॅनचा सुगावा लागला. हा प्लॅन होता भारताची युद्धनौका ‘आय.एन.एस.विक्रांत’ नष्ट करण्याचा. आपल्या जीवाची पर्वा न करता तिने ही माहिती भारताच्या रॉ ला कळवली. पुढे जे घडलं तो इतिहास आहे. भारताने तातडीने हालचाली करून ‘आय.एन.एस.विक्रांत’ला सुरक्षित करून पाकिस्तानच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. हेच ‘आय.एन.एस. विक्रांत’ भारताने १९९७ साली निवृत्त केलं.

भारताच्या ‘आय.एन.एस. विक्रांत’ला कोणी वाचवलं असेल तर ती होती सेहमत खान. जिच्या अचूक माहितीमुळे भारताने युद्धाचं पारडं फिरलं होतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १९७१च्या युद्धानंतर सेहमत खानवर दिलेली जबाबदारी संपली होती. तिला पुन्हा भारतात यायचं होतं पण या काळात ती गरोदर राहिली होती. रॉ ने तिला पुन्हा भारतात आणलं. भारतात आल्यावर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही सगळी घटना रॉ च्या फाईलींमध्ये आणि इतिहासाच्या पानात कित्येक वर्षं लुप्त झाली होती, पण तिचा तो गोंडस मुलगा पुढे आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय सैन्यात ऑफिसर झाला. आपल्या आईने गाजवलेलं कर्तृत्व त्यानेही कुठे समोर येऊ दिलं नाही. १९९९ पर्यंत पडद्यामागील या सूत्रधाराचा सुगावा कोणालाच नव्हता. कारगिल युद्धाच्यावेळी हरविंदर सिक्का हे कारगिलमध्ये जाऊन तिथल्या घडामोडींवर लिहीत होते. त्यात त्यांनी भारताच्या गुप्तचर संघटनेवर ताशेरे ओढले. कारगिलमध्ये इतकी घुसखोरी होणं हे भारताच्या गुप्तचर संघटनांचं अपयश होतं. त्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. अश्याच एका वेळी एक तरुण अधिकारी पुढे आला आणि त्यांनी देशभक्ती किंवा रॉ च्या एका यशाची ओळख हरविंदर सिक्का यांना करून दिली.

याच भारतीय सेनेच्या ऑफिसरने आपल्या आईच्या म्हणजेच सेहमत खानच्या पराक्रमाची गोष्ट त्यांना सांगितली. त्यांचं नाव जगापुढे येणं हे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळेच या गोष्टी समोर आणताना कमालीची गुप्तता बाळगली गेली. तब्बल ८ वर्षं सिक्का ही गोष्ट जगापुढे योग्य पद्धतीने आणण्यासाठी काम करत होते. याच घटनेवर त्यांनी ‘कॉलिंग सेहमत’ हे पुस्तक छापलं. त्यानंतर याच पुस्तकावर आधारित ‘राझी’ नावाचा हिंदी चित्रपट आला. ‘सेहमत खान’ हे नाव जरी अनेकांना कळलं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे राहीलं.

देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारी सेहमत खान खरी देशभक्त होती. आपल्या इतक्या मोठ्या त्यागानंतर तिची फक्त एकच इच्छा होती,

‘भारताच्या तिरंग्याचं अनावरण मला माझ्या घरात रोज करायचं आहे, त्याच पूजन करायचं आहे’…

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तत्त्वाप्रमाणे त्याचं अनावरण घरात करता येत नाही. पण सेहमत खान न चुकता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनधिकृतरित्या का होईना पण आपल्या घरात तिरंग्याचं पूजन रोज करत होती. आजही सेहमत खान हे नाव अनेकांना माहित असलं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे गुप्त राहिलेलं आहे.

पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षितेत महत्वाची भूमिका बजावणारी पडद्यामागची सूत्रधार ‘सेहमत खान’च्या कार्याला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या देशभक्तीला माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही पडद्यामागे राहून देशासाठी जे काही केलं त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल आणि त्यासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे.

सेहमत खान यांच्या आयुष्याचा प्रवास वाचून मला काही ओळी आठवल्या,

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी है हम, वतन है हिन्दोस्तां हमारा…
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा… हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्तां हमारा…

जय हिंद!!!… फोटो शोध सौजन्यः- गुगल

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा

Next Post

विधान परिषदेच्या मुंबई महानगरपालिका मतदारसंघातून भाजपतर्फे राजहंस सिंग यांची उमेदवारी घोषित

Related Posts
मेटेंचा मृत्यू जर घातपाती होता असे चव्हाणांचे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते तोंड शिवून का गप्प बसले होते? 

मेटेंचा मृत्यू जर घातपाती होता असे चव्हाणांचे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते तोंड शिवून का गप्प बसले होते? 

Pune – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेड येथे बोलताना,’माझा विनायक मेटे’ होईल असे वक्तव्य…
Read More
Suzuki Ertiga

नवीन Ertiga मध्ये 9-इंचाचा मोठा टचस्क्रीन आणि 360 डिग्री कॅमेरा मिळणार

नवी दिल्ली – जपानी ऑटोमेकर सुझुकीने 2022 फिलीपीन इंटरनॅशनल मोटर शो (PIMS) मध्ये अधिकृतपणे 2023 Suzuki Ertiga चे…
Read More
IPL 2024 | गुरु गंभीरचे ज्ञान, सुनील नरेनचे तुफान आणि कॅप्टन अय्यरची कमान... अशा प्रकारे केकेआर बनला चॅम्पियन

IPL 2024 | गुरु गंभीरचे ज्ञान, सुनील नरेनचे तुफान आणि कॅप्टन अय्यरची कमान… अशा प्रकारे केकेआर बनला चॅम्पियन

IPL 2024 | 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सचा 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला. या संघाने चेन्नईत सनरायझर्स…
Read More