पहाटेच्या शपथविधीबद्दल पहिल्यांदाच बोलले भगतसिंह कोश्यारी, खुलासा करत म्हणाले….

डेहराडून: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची अजूनही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीवरुन केलेल्या वक्तव्यांमुळे हा विषय केंद्रस्थानी आला आहे. मात्र ज्यांनी डोळ्यांनी हा शपथविधी होताना पाहिला ते माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी या विषयावर मौन पाळले होते. मात्र आता त्यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुंबई तक’ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राजकारणात जेव्हा मी राहणार नाही. अनेक लोक राहणार नाहीत. आणि जे खरे राजकारणी आहेत. अभ्यासक आणि विचारवंत आहेत, ते विचार करतील की एका रात्रीत हे कसं झालं. कधी कधी तर अशा गोष्टी एका क्षणात होतात. तुम्ही तर एका रात्रीच बोलत आहात. भूकंप आल्यानंतर एका क्षणात घडून जातं. कुणी सांगितलं की एका रात्रीत झालं. स्वाभाविक आहे की, आमच्याकडे एक मोठ्या पक्षाचा नेता येतो आणि त्याच्यासोबत मित्रपक्षाचा नेता येतो. ते म्हणतात की, माझ्याकडे पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. नेते विश्वसनीय आहेत. छोटे पण नाहीत.

अजित पवार छोटे नेते नाहीत. ते मला येऊन भेटले. मी म्हणालो ठिक आहे. तुमचं बहुमत आहे. सिद्ध करा. मी सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. असं झालं असेल की वेळ जास्त दिला. कोर्टाने सांगितलं वेळ कमी करा. कमी केला. बहुमत सिद्ध करण्यास समर्थ नव्हते मग त्यांनी राजीनामा दिला. ही सामान्य गोष्ट आहे, असे माजी राज्यपाल पुढे म्हणाले.

राज्यपाल कुणाला बोलवत नाही. हे काम राज्यपाल करत नाही. हे सरकार करतं आणि ज्याला शपथ घ्यायची असते, तो करतो. जे काही झालं, त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की, मी ज्यांना शपथ दिली, देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी यासंबंधी त्यांची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. मला वाटत त्या भूमिकेनंतर यात मी कुठे मध्ये येतो, असेही कोश्यारींनी शेवटी म्हटले.