‘अण्णाभाऊ साठे सभागृह येथील लाऊडस्पिकर्स सिस्टीम चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करा’

पुणे : अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची व नाटयगृहाची दुर्दशा आणि दोन कोटी रुपये किंमतीच्या अत्यंत मोलाचे लाऊडस्पिकर्स सिस्टीम चोरणाऱ्या व्यवस्थापक, कर्मचारी आणि रखवालदार यांना जबाबदार धरुन अटक करुन, बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दला तर्फे अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, महंमद शेख , सुरेखा भालेराव , प्रदीप पवार , गणेश लांडगे , चंद्रशेखर पिंगळे , सुनिल भिसे , वैशाली अवघडे , निलम सोनवणे , सूर्यकांत सपकाळ , दत्ता कांबळे , दत्ता डाडर , हरिभाऊ वाघमारे , संतोष कदम , वसंत वावरे इत्यादी पदाधिकारी आणि महिला पुरुष बहूसंख्येने सामील होते .

यावेळी बोलताना वैराट म्हणाले की सदरील प्रकार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताखेरीज होणे शक्य नाही . या प्रकरणात पोलीस कारवाई करुन एव्हाना संबंधितांना अटक होणे आवश्यक होते . पण महानगरपालिका प्रशासनाने त्यात हलगर्जीपणा दाखविला आहे. ते पुढे म्हणाले की कोटयावधी रुपये खर्चून अण्णाभाऊंचे हे स्मारक उभारले गेले आहे . या स्मारकाची अशी अक्षम्य हेळसांड होणे हे कदापिही सहन केले जाणार नाही . मातंग समाजाला व पुणेकरांना अभिमान वाटेल असे हे स्मारक आहे .

त्याची शान जपली गेली पाहिजे. येथे भविष्यात होणारा कोणताही येथील घटना अण्णाभाऊंचा अवमान समजला जाईल आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदविली जाईल. या घोटाळयातील व्यवस्थापक , कर्मचारी आणि रखवालदार यांना तात्काळ अटक करुन , मुख्य बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन योग्य ती उपाययोजना करेल अशी अपेक्षा आहे . अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा भगवानराव वैराट यांनी दिला आहे.

हे देखील पहा