उद्धव ठाकरे आज कमालीचे भावुक झाले होते; भास्कर जाधवांनी सांगितला ‘तो’ भावूक प्रसंग

ठाणे : शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता ठाकरे गटाने प्रबोधन यात्रा (Prabodhan Yatra) सुरु केली आहे.या यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली. यावेळी एक भावनिक प्रसंग सांगून शिवसेना नेते भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहातल्या प्रत्येक शिवसैनिकाला रडवलं.

ते म्हणाले, गेली ५ दशकं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना, जिथे अन्याय असेल तिथे वार करणारी शिवसेना, मराठी अन् हिंदुत्वावर (Hinduism) हुंकार काढणारी शिवसेना गेली तीन महिने अभूतपूर्व संकटातून जातीये. पक्षात अनेक वेळा अनेक नेत्यांनी बंड केलं. पण पक्षावर कुणी दावा सांगितला नाही. मात्र तीन महिन्यांपूर्वी ठाणेदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षाला सुरुंग लावून, उद्धव ठाकरेंना हादरा देऊन संपूर्ण पक्षच खिळखिळा केला.

हा सगळा वाद न्यायालयात आणि पुढे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दारी पोहोचला. आजपर्यंत शिवसेनेने प्राणपणाने जपलेलं चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं. या साऱ्या घटनांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कमालीचे भावुक झाले होते. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना नेते उपनेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीअगोदर मातोश्रीवर घडलेला भावनिक प्रसंग सांगून शिवसेना नेते भास्कर जाधवांनी सर्वांनाच भावनिक केलं.