सावळ्या रंगावरून टीका करणाऱ्यांची भाऊ कदम यांच्या मुलीने केली बोलती बंद; म्हणाली, “गोऱ्या मुलींना…”

चला हवा येऊ द्या या मराठी टीव्ही कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते भाऊ कदम यांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीवर आज लाखो चाहते फिदा आहेत. भाऊ कदम (Bhau Kadam) यांच्याप्रमाणेच त्यांची मोठी मुलगी (Bhau Kadam Daughter) मृण्मयी कदम हीदेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. मृण्मयीचा स्वत:चा यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर ती फॅशन, लाइफस्टाइल संबंधी व्हिडिओ टाकत असते. मात्र नेहमी मृण्मयीला (Mrunmayee Kadam) तिच्या सावळ्या रंगावरून ऐकवले जाते. आता मृण्मयीने तिच्या स्किन टोनवरुन तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

नुकतीच मृण्मयीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रंगाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, ‘मी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही. कारण लहानपणी कुटुंबामध्ये मला अशी वागणूक कधीच मिळाली नाही. कारण आमच्या घरात सगळ्यांचाच डस्की स्किन टोन आहे. त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल असा विचार माझ्या डोक्यात नव्हता.’

‘पण माझ्या स्किन टोनबद्दल लोक इतका का विचार करतात हे मला समजतच नव्हतं. लोक मला विचारायचे असा स्किन टोन असून तुला इतका आत्मविश्वास कसा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही असं विचाराल का तुला इतका आत्मविश्वास कसा?’ असं म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.