मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदार देखील नव्हते; भुजबळांचा जोरदार टोला

नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या आमदारकीमुळे नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली. संजय राऊत यांच्या या विधांवरून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेत मी असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणालो हे मान्य. मात्र, कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनाही काम केल्यानेच सामनाचे संपादक केले. मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते. नांदगाव मतदार संघ विसरा असं ते म्हणाले. या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

नांदगावमध्ये मी जे काम केलं, ते त्यांना माहीत नसावं. कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत परत यावे. आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले. त्यांनीही १०० प्लस आमदार निवडून आणण्याचं आवाहन केलंय. असा जोरदार टोला भुजबळ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

महाविकास आघाडीचे ज्याप्रमाणे शरद पवार शिल्पकार आहेत. तसेच संजय राऊतही शिल्पकार आहेत. त्यांनी या सुंदर शिल्पाची काळजी घ्यावी. त्यावर ओरखडाही उमटणार नाही हे पाहावे. असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.