उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी योगींची मोठी घोषणा; विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन, टॅब्लेट मिळणार

लखनौ – उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी योगी सरकार तरुणांना मोठी भेट देणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील तरुणांना स्मार्टफोन आणि टॅबलेटचे वाटप केले जाईल. योगी सरकार 10वी आणि 12वीच्या सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्याची तयारी करत आहे.

12वीमध्ये 65 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेल्यांचा या योजनेत समावेश केला जाईल. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की पहिल्या टप्प्यात सुमारे 2.5 लाख टॅब्लेट आणि 5 लाख स्मार्टफोन वितरित केले जातील. 23 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की त्यांचे सरकार नोव्हेंबरच्या अखेरीस तरुणांमध्ये टॅबलेट आणि स्मार्टफोन वितरित करण्याचे काम सुरू करेल.

यासाठी DIGI शक्ती पोर्टल नावाचे पोर्टल तयार केले आहे, जे लवकरच सीएम योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लॉन्च होणार आहे. या पोर्टलद्वारे टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वितरण केले जाईल. जिथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय स्मार्टफोन आणि टॅबलेटची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि मेल आयडीवर वेळोवेळी दिली जाणार आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की नोंदणीपासून ते स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वितरणापर्यंत संपूर्ण यंत्रणा मोफत आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, स्मार्टफोन आणि टॅब्लेट खरेदीसाठी GeM पोर्टलवर आतापर्यंतची सर्वात मोठी निविदा जारी करण्यात आली आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी 4700 कोटी खर्चून स्मार्टफोन आणि टॅबलेट खरेदी करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तांत्रिक छाननीनंतर पात्र कंपन्यांच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा आदेश निघणे अपेक्षित आहे.