महाविकास आघाडीत बिघाडी ? शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना आले उधाण

कोल्हापूर – राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींना तयारीला सुरूवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनीही या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेला (Shivsena) सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरू आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरू आहे. आमच्या देखील बैठका सुरू आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केल्या पाहिजेत, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.