भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा, राष्ट्रवादीत होणार मोठे इनकमिंग – जयंत पाटील

मुंबई : आज परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजून काही भाजपचे नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला आहे.

आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले.माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज आदरणीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.मला विश्वास आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची रीघ लागेल. विजय गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी पक्षात येईल असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

तर, भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.

शरद पवार पुढे म्हणाले की, आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.

परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार संदीप क्षीरसागर, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सुबोध मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.