राष्ट्रवादीचा खरा चाणक्य… शरद पवारांचा उजवा हात : प्रफुल्ल मनोहरभाई पटेल

मुंबई : आजकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांना मजबूत राजकीय व्यवस्थापकांची गरज असते. राजकीय व्यवस्थापक म्हणजे, पक्षाची ती व्यवस्था जी पक्षाच्या आत आणि बाहेर दोन्ही संकटे हाताळू शकते. ठोबळमनाने म्हणाल तर राजकारणाच्या प्रत्येक कलेत पारंगत असणारा… अगदी तो जनाधाराच्या दृष्टीने ते शून्य असले तरीही. ज्यावेळी राजकीय राणीनीतीकर या शब्दाचा उदय व्हायचा होता त्यावेळेची राजकारणातील महामेरू शरद पवार यांच्याकडे असा व्यक्ती होता जो ही भूमिका ठामपणे पार पडायचा त्याच नाव होत प्रफुल्ल मनोहर भाई पटेल…

दिवंगत प्रमोद महाजन, अहमद पटेल, अमर सिंह, प्रेम गुप्ता, सतीशचंद्र मिश्रा, प्रफुल्ल पटेल इत्यादींची नावे अनेकदा राजकीय गुण असलेल्या लोकांमध्ये घेतली गेली आहेत. त्यात प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचा हात मानले जातात. पण ते शरद पवारांच्या जवळ कसे आले, याची रंजक कहाणी आहे. 50, 60 आणि 70 च्या दशकात यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे नेते होते. विशेषत: 1960 मध्ये जेव्हा मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन भाग झाले आणि मोरारजी देसाईंसारख्या मोठ्या नावांना गुजरातमधून येणारे नेते म्हटले जाऊ लागले. त्यावेळी विदर्भातून एखादा नेता येत असे. त्याचं नाव होत मनोहर भाई पटेल. मनोहर भाई गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. मनोहर भाई हे यशवंतराव चव्हाण यांचे समर्थक…

त्याचवेळी बारामतीतील वाणिज्य शाखेचा पदवीधरही यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाचे धडे गिरवत होता. त्यांचे नाव होते शरद पवार…. शरद पवार आणि मनोहर भाई पटेल या दोघांचीही बैठक यशवंतराव चव्हाण यांच्या घरी होत असे… कधी कधी मनोहरभाईही मुलगा प्रफुल्लला घेऊन पोहोचायचे. पण याच दरम्यान 1970 मध्ये मनोहर भाई पटेल यांचे निधन झाले. तेव्हा प्रफुल्ल पटेल अवघे १३ वर्षांचे होते. हा तो काळ होता जेव्हा शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवत होते.

वडिलांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शिक्षण पूर्ण केले. आणि शरद पवार यांच्यातसोबत जोडले गेले. त्या काळात शरद पवारांच्या दरबारात दोन तरुण नेत्यांची जबरदस्त चलती होती. एक सुरेश कलमाडी आणि दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल. पण ९० च्या दशकात सुरेश कलमाडींनी शरद पवारांचा विश्वास गमावला. पण, प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांशी असलेली जवळीक काही कमी झाली नाही.1985 मध्ये प्रफुल्ल पटेल गोंदिया महापालिकेचे सभापती झाले.

त्यानंतर आले 1991चे वर्ष… चंद्रशेखर सरकार अकाली मृत्यूला बळी पडले. दहाव्या लोकसभेची निवडणूक तोंडावर होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना विदर्भातील भंडारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले. प्रफुल्ल पटेल यांनीही बाजी मारली. पण त्यांचे गुरू शरद पवार यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पीव्ही नरसिंह राव यांच्याकडून पराभव झाला . मात्र, पवारांची गाडी 7 रेसकोर्स रोड येथून गाडी निघूनही दिल्लीत स्थिरावली. संरक्षण खात्याची जबाबदारी पवारांच्या खांद्यावर आली. त्या काळात शरद पवार यांच्याकडे नरसिंह राव यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.

राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील लोक शरद पवारांच्या भोवती आणि विशेषतः त्यांच्या दिल्ली-मुंबई येथील निवासस्थानी जमत असत. या सगळ्या मेळाव्यावर आणि व्यवस्थेवर एका माणसाचे बारीक लक्ष होते. तो माणूस होता प्रफुल्ल पटेल.

पण याच काळात म्हणजे ९० च्या दशकात शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रफुल्ल पटेलांची धमक वाढू लागली. याचदरम्यान, त्यांनी 1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकाही जिंकल्या. या दोन्ही निवडणुकांत त्यांचा काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.

वर्ष होत १९९८-९९… शरद पवार बारामतीचे काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. पण काही काळात वाजपेयी सरकार पडले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मांडताना म्हंटल आमच्याकडे 272 खासदारांचा पाठिंबा आहे.’ मात्र राष्ट्र्पतीने पाठिंब्याचे पत्र मागितल्यावर काँग्रेसने हात वर केले. परिणामी मध्यावधी निवडणुकांची वेळ आली.

या साऱ्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की, विरोधी पक्षनेते शरद पवार यापुढे काँग्रेसमध्ये राहून पंतप्रधान होऊ शकत नाहीत. परिणामी, या गोष्टीला जवळपास 3 आठवडे होते न होतेच ते शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस पक्षात बंडाचे निशाण फडकवले. यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपला नवा पक्ष सुरू केला. नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

त्यावेळी सर्वच पक्षांमध्ये राजकीय व्यवस्थापकांचा भरणा होता. प्रमोद महाजन, पी.आर. कुमारमंगलम, अमरसिंह, कमलनाथ, अहमद पटेल यांचा जोरदार बोलबाला होता. अशा परिस्थितीत शरद पवारांना महाराष्ट्रातील समीकरणे हाताळण्याबरोबरच दिल्लीच्या राजकारणाची चाल, चारित्र्य आणि चेहरा समजून घेणाऱ्या राजकीय व्यवस्थापकाचीही गरज होती. या कामासाठी पवारांच्या विश्वासातील लोकांच्या टोळीत प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा चांगले नाव दुसरं कोणतंच नव्हतं.

प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीच्या राजकारणाची जाण होती, पण विदर्भातील ज्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत मानली जाते, तिथेही पक्षाच्या मजबूत चेहऱ्याची उणीव ते भरून काढत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना लोकसभा म्हणजे दुरून डोंगर साजरे अशीच होती. तरीही, 2000 साली शरद पवार त्यांना राज्यसभेवर घेऊन गेले. तिथून प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा प्रवास सुरु झाला.