‘बिपिन रावत यांच्या मृत्यूमुळे देशाचं आणि लष्कराचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं’

नवी दिल्ली- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि संरक्षण दलातील इतर ११ जणांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन होणं हे प्रचंड वेदना देणारं आहे. बिपिन रावत यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाचं आणि लष्कराचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे.”