विधान परिषद निवडणूकीत मुंडे समर्थक आमदार बिघडवणार भाजपचे गणित ? काँग्रेसलाही क्रॉस व्होटिंगची भीती

मुंबई – विधान परिषदेच्या ( Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक  चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत, तर सत्ताधारी एमव्हीएचा घटक असलेल्या काँग्रेसने दोन उमेदवारांना तिकीट दिले आहे. मात्र, अनुक्रमे पाचव्या आणि दुसऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडे पुरेशी मते नाहीत. राज्यसभा निवडणुकीच्या विपरीत, ज्यामध्ये आमदारांना त्यांचे मतपत्रिका संबंधित पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवावी लागते, विधानपरिषदेच्या निवडणुका गुप्त मतपत्रिकेद्वारे होतील, ज्यामुळे क्रॉस व्होटिंग (Cross Voating) होईल  अशी भीती दोन्ही बाजूच्या नेत्यांना आहे.

भाजपने पुन्हा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना तिकीट दिले असून राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांनाही तिकीट दिले आहे. या यादीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान मिळालेले नाही. या निर्णयामुळे मुंडे समर्थकांची निराशा झाली. यामुळेच मुंडे समर्थक आमदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. काँग्रेसने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने विद्यमान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknatah Khadase) यांना उमेदवारी दिली आहे मात्र कॉंग्रेसला देखील  क्रॉस व्होटिंग होईल  अशी भीती आहे.