भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही -पटोले.

सेवाग्राम – भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस पक्षाचा विचार गाव खेड्यापर्यंत आणि शेवटच्या माणसांपर्यंत घेऊन गेले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात १२ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव, वर्ध्याचे पालक मंत्री सुनिल केदार, माजी मंत्री आ. रणजित कांबळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव वामशी रेड्डी, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव आणि पंजाबचे सह प्रभारी हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढत होता त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने उभे असणारे आज लोकांना राष्ट्रवादाचे धडे देत आहेत. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षापेक्षा जास्त काळ कधी तिरंगा फडकवला नाही ते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणा-यांना देशद्रोही म्हणत आहेत. सत्तेचा गैरवापर करून देशाच्या स्वातंत्र्यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा संघ आणि भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. सचिन राव यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात देशभरातील ३४ राज्यातून आलेले तुम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी या वैचारिक लढ्यातील महत्वाचे सैनिक आहात. सातत्याने खोटे बोलून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांवर खोट्या माहितीचा भडीमार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्याचा व काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचे सुनियोजीत कारस्थान भाजप आणि संघाकडून सुरु आहे. हा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण आपणा सर्वांना या शिबिरातून मिळाले आहे. प्रशिक्षणातून घेतलेला विचार गावखेड्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व या देशातील लोकशाही आणि हुकुमशाही वाचवण्याची लढाई लढत आहोत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील बंधुता व एकतेला नख लावणा-या धर्मांध विचारांविरोधात आपली लढाई आहे. ही विचारांची लढाई अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी तुमच्यासारख्या प्रशिक्षीत कार्यकर्त्यांची गरज आहे. सेवाग्राम मध्ये झालेले हे शिबिर विचारांची शिदोरी देणारे ठरले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यावेळी शिबिरार्थींनी चार दिवसांच्या आपल्या प्रशिक्षणातील अनुभवांची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री बी. के. हरीप्रसाद, खा. राजीव गौडा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, दिलीप रे, ज्येष्ठ गांधीवादी व सेवाग्रामचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, डी. पी. राय, दीपक बाबरीया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी शिबिरातील कार्यक्रमांची माहिती दिली तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पंजाबचे सह प्रभारी हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

तत्पूर्वी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील कारंजा भोगे गावात काँग्रेसच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधातील जनजागण अभियाना अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली होती. रविवारी हे सर्व नेते कारंजा गावात मुक्कामी होते. या प्रभात फेरीत कारंजा गामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व नेत्यांची गावातील घरोघरी जाऊन महागाई व इंधन दरवाढीला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कशी कारणीभूत आहेत याची माहिती दिली. वर्ध्याचे पालकमंत्री सुनिल केदार, माजी मंत्री आ. रणजित कांबळे, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

You May Also Like