डेलकर कुटुंबीयांनी केला होता शिवरायांच्या पुतळ्यास विरोध; आता भाजप उभारणार भव्य अश्वारूढ पुतळा 

सिल्वासा – ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काळे झेंडे फडकवणारे कुटुंब तेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चौकाला देताना अडथळे आणणारे लोकही त्याच परिवाराशी संबंधित आहेत. तेच लोक आज सत्तेसाठी ‘जय शिवाजी, जय भवानी’ च्या खोट्या घोषणा देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून कार्यरत राहणारे तर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. मी सर्वांना आश्वासन देतो की भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिल्वासामध्ये मोठ्या आदराने आणि अभिमानाने प्रस्थापित केला जाईल,’ या शब्दांत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांनी सिल्वासा येथे आश्वासन दिले.

दादरा नगर हवेली (दानह) लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दानह प्रदेशातील मराठी समाजाच्या बैठकीत पाटील बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि दानह व दीव दमणच्या प्रभारी विजया रहाटकर, भाजप उमेदवार महेश गावित, प्रदेशाध्यक्ष दीपेश टंडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, सिल्वासा नगराध्यक्ष राकेश सिंह चौहान, ज्येष्ठ कार्यकर्ते फत्तेसिंह चौहान, दिग्विजय सिंह परमार, उदय सोनवणे, सुनील महाजन, प्रशांत पाटील, महेश गावित, गोविंद पाटील, आनंद सावरे, सुनील पाटील. गोपाल पाटील, डॉ नितीन राजपूत, डॉ. सी. सी. पाटील, दीपक कदम, शत्रुघ्न पाटील, नंदू शेवाळे, सुदर्शन कांबळे यांच्यासह शेकडो मराठी लोक बैठकीस उपस्थित होते.

‘सिल्वासा ही मराठी माणसांची कर्मभूमी आहे. मराठी माणसांनी कष्टाने, मेहनतीने या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या प्रदेशावर येथील स्थानिकांइतकाच मराठी माणसांचाही अधिकार आहे. दानह प्रदेश भयमुक्त करण्यासाठी आणि घराणेशाहीचा पराभव करण्यासाठी आपण मला विजयी करावे,’ असे आवाहन महेश गावित यांनी केले.

सी. आर. पाटील म्हणाले की, सिल्वासा परिसर पूर्वी फक्त दहशत आणि गुंडगिरीसाठी ओळखला जात होता. एका कुटुंबाने हा परिसर आपली जहागिर असल्यासारखा करुन ठेवला होता. भाजप खासदार नटूभाई पटेल यांनी ही प्रतिमा बदलली. भाजपाच्या विजयानंतर सिल्वासामध्ये विकासाची गंगा वाहू लागली. सिल्वासामध्ये सुरु झालेली विकास आणि प्रगतीची घोडदौड कायम राखण्यासाठी आपल्याला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताचे अनेक प्रकल्प या ठिकाणी सुरु केले आहेत. यात वैद्यकीय महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय मैदान, अद्ययावत रुग्णालय आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या या विकासकामांप्रती कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी महेश गावित यांना विजयी केले पाहिजे.

डॉ नरेंद्र देवरे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाला विरोध करणाऱ्या परिवाराने त्यावेळी मराठी माणसांना मारहाणही केली होती. त्या परिवाराने मराठी माणसांना कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. कायम दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. या परिवाराला त्यांची जागा दाखवली पाहिजे,’ असे मत डॉ. देवरे यांनी व्यक्त केले.

बाळासाहेबांनी काय सांगितले होते आणि…

‘सगळ्यांचे ह्रद्यस्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर फक्त एकदाच प्रचार सभा घेतली होती. ते 1999 मध्ये सिल्वासा येथे आले होते. त्यांनी डेलकर कुटुंबीयांविरुद्ध रणशिंग फुंकले होते आणि सांगितले होते दादागिरी चालणार नाही. काय त्यांचे विचार होते आणि त्यांचे वारसदार आज कुठे चालले आहेत? कोणाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत? एका बाजूला दहशतवादाचे डबल इंजिन डोक्यावर बसले आहे. दुसरीकडे विकासाचे डबल इंजिन भाजपाने लोकांपुढे ठेवले आहे.’असं भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

हे ही पहा: