ठाकरे गटाची ‘ती’ चाल अन् भाजपाचे वाढले टेन्शन, मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात?

मुंबई – भारतीय जनता पार्टीतर्फे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी पक्षाने शुक्रवारी जाहीर केली. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या शिवसेना गटाकडून मुरजी पटेल यांच्या अडचणी वाढवणारे पाऊल उचलण्यात येण्याची चिन्हे आहेत. ज्यामुळे ठाकरे गट व भाजपा मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाने मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्याची तयारी सुरू केली असून, ठाकरे गट मुरजी पटेल यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने घेतलेल्या आक्षेपामध्ये तथ्य आढळल्यास मुरजी पटेल यांची उमेदवारी (Murji Patel Candidacy In Danger) धोक्यात येण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लटके यांनी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी दिलेला मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने रखडवून ठेवला होता. त्यावरून ठाकरे गटाने भाजपा आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. आता त्याचा वचपा ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन काढण्यात येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक संदीप नाईक हे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात आक्षेप घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांच्याविरोधातील पुरावे निवडणूक आयोगाकडे सोपवले जातील. यांमुळे मुरजी पटेल यांच्यापुढील अडचणी वाढू शकतात.