कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही ?

मुंबई   – मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशिन्सबाबत नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे मात्र कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या वापरावर बंदी घातली आहे आणि कागदी (बॅलेट) पेपरचा वापर करून सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली. जगातील अनेक विकसित देशांनी ईव्हीएमच्या सत्यतेवर शंका घेऊन वापरावर बंदी घातली आहे याकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

भारतातल्या अनेक राजकीय पक्षांना तसेच वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनांना ईव्हीएम मशीनबाबत संशय आहे. त्याबाबतची चिंता अनेक वेळा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मोदी सरकारने या चिंतेचे अद्याप निराकरण केलेले नाही असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी ईव्हीएमच्या वापराशी संबंधित समस्यांबाबत प्रमुख विरोधी पक्षांची बैठक मागील काही दिवसाआधी बोलावली होती हे सांगतानाच जर भाजपला २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा एवढा विश्वास असेल तर त्यांनी नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या मनातील सर्व शंका दूर करून कागदी (बॅलेट) पेपरचा वापर करून मतदानाला सामोरे जावे असे आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे.कागदी (बॅलेट) मतपत्रिकेवर मतदान झाल्यास कदाचित १५० चा आकडा पार करता येणार की नाही याचीच भीती भाजपला आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.