बाळाच्या मृत्यूचा जाब विचारणाऱ्या भाजपा नगरसेविकांंना गुंडाकडून धक्काबुक्की

मुंबई  – नागरिक, संपादक, पत्रकार बोलले तर त्यांना घरात घुसून, मारले जाते, गुन्हे दाखल केले जातात, आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थितीत केले तर त्यांना निलंबित केले जाते. मंत्रीच महिलांवर अत्याचार करतात, पोलिसांना वसूली करायला लावली जाते, आता मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांंना असभ्य बोलले जाते त्यांना मारण्यासाठी गुंडे बोलवले जातात महाराष्ट्रात गब्बर चे राज्य आहे काय? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत काल घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल आमदार अशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत अँड आशिष शेलार यांनी मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांनी कालच्या घटनेची, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या वक्तव्याची चौकशी करावी, आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. याचवेळी सत्ताधारी शिवसेनेने माहुल येथील 30 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप ही केला. यावेळी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्र यांच्यासह नगरसेविका आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय ही उपस्थितीत होते.

नायर रुग्णालयातील हा प्रकार टाळक फिरवणारा असल्याचे म्हणत आमदार आशिष शेलारांनी रुग्णालयातील परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, घटनेनंतर नायर रुग्णालयात पोहचलेल्या जखमी रुग्णांना जवळपास ४५ मिनिटे तसेच ठेवले होते. त्यांच्यावर कोणतेही उपचार किंवा त्यांची विचारपूस केली गेली नाही. रुग्णालयाच्या याच हलगर्जीपणामुळे चार महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आणि त्याच्यामागे त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. या सगळा प्रकार टाळक फिरवणारा आहे.

आमदार अँड आशिष शेलार यांनी पुढे असे म्हटले की, घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुंबईच्या महापौर किंवा पालिकेतील एकही अधिकारी किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी पोहचला नाही. मात्र त्यांच्या आधी भाजप नेत्यांचा गट तिथे पोहचला आणि त्यामुळे मुंबई पालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेला हा हलगर्जीपणा सर्वांसमोर आला. त्याचा निषेध म्हणून आरोग्य समितीच्या भाजपा सदस्यांनी राजिनामा दिला. सभागृहात याबाबत जाब विचारला तर त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभागृहात असभ्य भाषा वापरली, गळा दाबून टाकू, गळा चिरुन टाकू पर्यंतची दमदाटी ते करु लागले. त्याबद्दल सवाल केला तर यशवंत जाधव यांनी भायखळ्यातील गुंड सभागृहाबाहेर बोलावले. त्यांनी भाजपा नगरसेविकांंना धक्काबुक्की केली. मुंबईकरांंनी निवडून दिलेल्या नगरसेविकांंसोबत असे वागणार? गुंडाकडून धक्काबुक्की करणार? गब्बर सिंगचे राज्य आहे काय? असा खरमरीत सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी या सगळ्या घटनेचे चित्रण आमच्याकडे आहे त्यामुळे त्याची चौकशी करा अशी मागणी केली.

30 कोटींचा भूखंड पळवण्यासाठीच गोंधळ

माहुल येथील पंपिंग स्टेशनसाठी एक खाजगी भूखंड जो साडेचार लाख चौरस फुटाचा आहे जो सिआरझेडच्या बाहेर आहे आणि बांधकामासाठी उपयुक्त ठरेल असा भूखंड देण्याचा प्रस्ताव कालच्या गोंधळात मंजूर करण्यात आला. या बदलत्यात पालिकेला खाजगी मालकाचा दिड लाख चौरस फुटाचा सीआरझेड मधील भूखंड घेण्यात आला. याला भाजपाने विरोध केला त्यावर सभागृहात मतदान मागितले ते दिले नाही. हा भूखंड पळवता यावा म्हणूनच गोंधळ घालण्यात आला. जेव्हा भाजपाचे नगरसेवक लहान बाळाच्या मृत्यूचे प्रश्न विचारत होते तेव्हा शिवसेना 30 कोटींचा भूखंड पळवत होती. असा गंभीर आरोप आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे

महापौरच पोहोचल्या नाहीत, आमदर तर हवेतच!

वरळीतील बीडीडी चाळीत एवढी भीषण दुर्घटना घडली पण महापौरांनाच इथे यायला 72 तास उलटले. स्थायी समिती अध्यक्ष पोहोचले नाहीत. त्यामुळे वरळीतल्या स्थानिक आमदारांकडून काय अपेक्षा करणार? हे आमदार.. युवराज (आदित्य ठाकरे) तर हवेतच असतात, त्यांचे विमान जमिनीवर यायला तयार नाही, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

पेंग्विनसाठी रोज दीड लाख रुपये, बाळासाठी 45 मिनिटेही नाहीत?

याच परिसरात असलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विनवर दिवसाला दीड लाख रुपये खर्च होतात. वर्षाला या पेंग्विनवर 15-16 कोटी रुपये खर्च कराल. पण बाळाला वाचवण्यासाठी 45 मिनिटात पोहोचणार नाही, हा प्रश्न विचारला तर झोंबतो. आम्ही झोंबणारे प्रश्न विचारतो म्हणून तुम्ही झोंबाझोंबी करणार.. या हलगर्जीपणाविरोधात आम्ही हल्लाबोल करणार.. अशी स्पष्टोक्ती अँड आशिष शेलार यांनी केली.

आरोग्य सेवेचे 22 हजार 500 कोटी खर्च करुन ही मुंबईकरांची ही अवस्था?

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी वर्षाला साडेचार हजार कोटी खर्च केले जातात म्हणजे पाच वर्षात तब्बल 22 हजार 500 कोटी खर्च करुन ही मुंबईकरांची ही अवस्था? असेल तर आम्ही प्रश्न विणारयचे नाही? आम्ही बोलायचे नाही? हिशेब मागायचा नाही? कितीही दादागिरी केलीत, कितीही झोंबले.तरी आम्ही हे प्रश्न विचारणार, असा इशाराही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला.

हिंसेचे धडे ममतादिदींंकडून घेतले का?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात आल्या असताना त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर गुप्त बैठका करून महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री हेच हिंसेचे धडे घेत होते का? विरोधकांचे गळे कापण्याचे धडे पश्चिम बंगाल कडून घेतले जात आहेत का? असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी या वेळी पुन्हा उपस्थित केला