पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटवल्याचा आरोप; भाजपाकडून पवारांविरुद्ध कारवाईची मागणी

 मुंबई –   ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी (raj Thackeray) राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार (Sharad pawar) मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने (James Lane) या वादावर भाष्य केलं आहे.

इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे (Kiran tare) यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली आहे.  यात जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.

पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही”.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही.

तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणानंतर आणि विशेष करुन लेन यांनी मुलाखत समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातळखकर (BJP MLA Atul Bhatlakhakar) यांनी या मुलाखतीची लिंक शेअर करत शरद पवारांचा खोटारडेपणा उघड पडल्याचा टोला लगावलाय. “घ्या शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला. ज्या मुद्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण (Maratha vs. Brahmin)  हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला,” असं भातखळकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’चा लेखक जेम्स लेन याने आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो असे स्पष्ट केलय,” असंही भातखळकर यांनी मुलाखतीचा संदर्भ देत सांगितलंय.

“आता महाराष्ट्रात विनाकारण पेटवपेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का?,” असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केलाय. तसेच, “राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी,” असंही ते म्हणालेत.