आपले युवा नेते आदित्य ठाकरे नेतृत्व करतायत हेच नकोय भाजपला – खैरे 

 संभाजीनगर – शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेमध्ये जाहीर टीका केली. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषण करताना चंद्रकांत खैरे यांनी २०१९ साली मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं हे सांगताना भाजपवर टीका केली.

ते म्हणाले, मी त्या बैठकीला होता, आदित्य ठाकरे त्या बैठकीला होते. अमित शाह आले तेव्हा आमचं ठरलं की मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यायचं पण उद्धव ठाकरे आधी आम्हाला अडीच वर्ष घ्या असं म्हणाले. त्यावर ते बघू असं म्हणाले. नंतर मग अचानक निरोप आला (भाजपाचा) की आम्हाला पाच वर्ष पाहिजे,” असं मातोश्रीवरील बैठकीसंदर्भात बोलताना खैरे यांनी सांगितलं.

आता या भाजपावाल्यांना नेमकं किती पाहिजे? सगळी सरकारं पाडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामध्ये आपल्याला सुद्धा गोवलं, असा आरोप खैरेंनी केला.आपले नेते उद्धव ठाकरे आहेत. दैवत बाळासाहेब आहेत. आपले युवा नेते आदित्य ठाकरे नेतृत्व करतायत. हेच नकोय भाजपाला. त्यांनी सरकार पाडण्यासाठी काय काय केलंय आपल्याला माहितीय,असा टोलाही खैरे यांनी लगावला.