भाजप लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय; जयंत पाटलांची टीका

मुंबई – राज्यभरात सध्या क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असल्याने या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यातच काल अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला.

क्रुझ पार्टी प्रकरणी पंच असणारे प्रभाकर साईल यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, समीर वानखेडेंकडून या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. सध्या प्रकरणावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. मात्र, प्रभाकर साईल यांनी लावलेले आरोप त्यांनी फेटाळलेत.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय भाजपचे केंद्रसरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

हे ही पहा: