‘भाजपने अनेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी काँग्रेसला दिली आहे’

पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी झाले तर त्याला कॉंग्रेस जबाबदार असेल, असा इशारा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. भाजपने आपले लोक काँग्रेसमध्ये पाठवले आहेत, जे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि निवडणुकीनंतर पुन्हा भाजपमध्ये येतील. भाजपने अनेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी काँग्रेसला दिली आहे असा आरोप देखील त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, गोव्यात काँग्रेसने 25 वर्षे, भाजपने 15 वर्षे राज्य केले, परंतु त्यांनी फक्त घोटाळाच केला. भाजप आणि काँग्रेसकडे गोव्याच्या विकासाचा किंवा गोव्याच्या उन्नतीचा कोणताही अजेंडा नाही. भाजप सरकारचे मंत्री नोकरी घोटाळा, वीज घोटाळा, कामगार घोटाळा, व्हेंटिलेटर घोटाळा आणि सेक्स स्कँडलच्या आरोपांनी कलंकित आहेत. खाणकामात 36,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवर झाले, पण भाजपने त्यांना दशकभर संरक्षण दिले.

काँग्रेसने वेळोवेळी भाजपला सरकार स्थापनेसाठी मदत केली आहे; लोक काँग्रेसमध्ये येतात, आमदार होतात आणि नंतर भाजपमध्ये जातात. गोवेकरांना भाजप किंवा काँग्रेसला मत दिल्यास त्यांना जनतेला लुटण्यासाठी आणखी पाच वर्षे मिळतील. सर्व पक्षांच्या मतदारांना आवाहन, यावेळी मतांचे विभाजन होऊ देऊ नका; आमच्यावर विश्वास ठेवा आणि आप ला संधी द्या.

‘आप’चे सरकार आल्यावर प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत 10 लाख रुपयांचा स्पष्ट लाभ मिळेल. आप सरकार मोफत वीज-पाणी, मोफत आरोग्य सेवा, मासिक बेरोजगारी भत्ता म्हणून तीन हजार रुपये आणि प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये देणार आहे. आप ला मत द्या, आम्ही जे काही करू ते प्रत्येक गोव्याच्या उन्नतीसाठी मदत करेल अस अरविंद केजरीवाल म्हणाले.