भाजप अवघड पक्ष आहे स्वतः काही करता येत नाही म्हणून बुजगावणी उभी केली आहेत – जयंत पाटील 

कोल्हापूर – पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. जनतेचे प्रश्न आहेतच परंतु पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर काम करतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तीन लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे पवारसाहेब आहेत. आज परिवार संवाद यात्रा(Pariwar Sanwad Yatra) संपली. कागलमध्ये सभा झालीय त्या त्यावेळी पक्षाचा मोठा विजय मिळाला आहे आणि काल कागलमध्येच सभा झालीय. राष्ट्रवादी राज्यात मोठा पक्ष होईल याबाबत शंका नाही असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी काल कोल्हापूर येथे सभेत व्यक्त केला.

शिवभोजन थाळीने (ShivBhojan Thali) गोरगरीबांच्या पोटाचा मोठा प्रश्न सुटला. आमच्या मंत्र्यांनी अनेक विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. कोरोना (Corona) संकटामुळे आम्ही सांगायला गेलो नाही त्यामुळे आमचा प्रचार झाला नाही अशी स्पष्ट कबुलीही जयंत पाटील यांनी दिली. आमच्या नव्या मुलांना – मुलींना पुढे आणतो. नवीन पिढी घडवत आहोत. त्यामुळे २०२४ नव्हे तर २०३४ पर्यंत नवीन पिढी घडली पाहिजे असा प्रयत्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जातीयवादी शक्ती सत्तेत आली तर जात्यंध शक्ती वाढेल. मुळ मुद्दयावरुन भरकटवायचे काम केले जात आहे. महागाईचा कहर झालाय. या सगळ्या गोष्टींविरोधात वज्रमूठ एकत्र केली पाहिजे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये जयंत पाटील यांनी भरला.

भाजप अवघड पक्ष आहे स्वतः काही करता येत नाही म्हणून बुजगावणी उभी केली आहेत. आता सध्या एक भोंगा वाजत आहे अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली. काही लोक बोलत आहेत आपल्या सर्वांचा डिएनए एक आहे तर मागे राहिलेल्या लोकांच्या आरक्षणाला का विरोध करता. जे तुम्ही अडथळे करत आहात ते दूर करण्याचे काम करा. सगळ्यांच्या मागे राहिलेल्या व डिएनए एक असलेल्या लोकांना आरक्षण देण्यासाठी पुढे या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

महाराष्ट्रात पुन्हा मोठी ताकद उभी करायची आहे. एक तास राष्ट्रवादीसाठी पहिल्या शनिवारी द्या आणि बैठका घ्या असे सांगतानाच ही लढाई विचारांची आहे. आपली टॅगलाईन निर्धार पुरोगामी महाराष्ट्राचा अशी आहे त्यामुळे असा सर्वसमावेशक निर्धार आपल्याला करायचा आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राला समजून घेण्याची संधी पक्षाने दिलेल्या संधीमुळे मिळाली असेही जयंत पाटील म्हणाले. २०२४ ला आम्ही आघाडी करु… त्यावेळी सर्वकाही चांगले होईल. परंतु आम्ही जे ठरवू त्यातील प्रत्येक जागा विजयी झाली पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली.