एसटी कामगारांचे आंदोलन भाजप चुकीच्या वळणावर नेत आहे – नवाब मलिक

मुंबई – एसटी कामगारांचे आंदोलन भाजप चुकीच्या वळणावर नेत असल्याचे सांगतानाच एसटी कामगारांच्याबाबत सरकारच्या मनात नकारात्मक भूमिका नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

एसटी कामगारांचा पगार वाढावा… त्यांना बोनस मिळावा ही भूमिका सरकारची आहे. मात्र या कामगारांना राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी केल्यास राज्याला पगार देण्यासाठी वेगळं कर्ज घ्यावे लागेल. मुळात निगम, मंडळ असेल किंवा मनपा असेल या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची जबाबदारी त्यांचीच असते. जर यापैकी कुठलीही संस्था आर्थिक डबघाईला आली तर राज्यसरकार अनुदान देत असते असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या लोकांचे इतकंच प्रेम ऊतू जात असेल तर एअर इंडियाचे कर्मचारी असतील किंवा टेलिकॉम सेक्टरमधील कर्मचारी यांची जबाबदारी घेऊन मोदींच्या घराबाहेर आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपचं कारस्थान एसटी कामगारांच्या लक्षात यायला लागल्याने ते कामावर रुजू होऊ लागले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.