‘विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा नेता व कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही’

मुंबई – हे काय आम्हाला धमक्या देत आहेत.. यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही… असे स्पष्ट शब्दात बजावतानाच मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा नेता व कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

आज ज्यांच्यावर आरोप होते ते बाहेर आले आणि जे आरोप करत होते ते आरोपांच्या पिंजर्‍यात आहेत. एकंदरीत सिनेमाचा सिक्वेन्स बदलला आहे त्याचा अंत तर होणारच आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी आज दिला.

दुसरा केपी गोसावी की काय ते माहित नाही पण मग हे एवढे का घाबरत आहेत. दाऊद की ज्ञानदेव… यास्मिन की जास्मिन… काशिफ खान की काशिफ मलिक खान… नावांचा खेळ या सिनेमात मोठा आहे… नाव बदलून तो मी नव्हेच हे सांगून चालणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडे याचे कुटुंब आठवले आणि सोमय्या यांना भेटत आहेत. त्या अगोदर समीर वानखेडे याने आठवले यांची भेट घेतली आहे. तर काही मागासवर्गीय नेत्यांचीही भेट घेतली आहे. भाजपचा एक दूत जो माजी मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये होता तो जाऊन समीर वानखेडेला ईडीच्या कार्यालयात भेटतोय. तो इतका जवळचा आहे की, माजी मुख्यमंत्री त्याच्या घरीही जात होते. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश होता. तो चेंबरमध्ये राहतो. जेव्हापासून मी हा विषय लावून धरला आहे तिथपासून हा गृहस्थ ईडी कार्यालयात जात आहे. तो का जातो? कुणासाठी जातो? कुणाच्या मनात काय भीती आहे? हे सगळं फर्जीवाडा करुन सुपारी वाजवण्याचे काम होते का? असे अनेक सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा ना दूताच्या माध्यमातून कशाला भेटता अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे.. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

काल मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे याने धर्म बदलला नाही असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना केले. हलदर तुम्ही संविधानिक पदावर आहात त्याचा मान राखा असे सांगतानाच आयोगाची एक कार्यप्रणाली आहे एखाद्याने तक्रार केली तर त्याची चौकशी केली पाहिजे व त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली.

दरम्यान समीर वानखेडे याने धर्म बदलला नाही हे तुम्ही बोलत आहात हे सत्य आहे कारण तो जन्मापासूनच मुसलमान आहे. त्याच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुलं लहानपणापासून मुसलमान आहेत. मुसलमान पध्दतीने जगले आहेत. मी समीर वानखेडे याच्या लग्नाचा विषय समोर आणला. मी काल (शनिवारी) एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. तो समीर वानखेडे याच्या बहिणीचा नवरा आहे. आज तो युरोपच्या वॅनिसमध्ये राहतो. मुळचा तो सुरतचा राहणारा आहे. हा विषय आम्ही समोर आणला आहे. जिचा नवरा आहे तिने ट्वीट करुन हा फोटो का आणला अशी विचारणा केली. मी हा फोटो समोर आणला नाही. जर तुमच्याकडे आयोग चौकशी करेल त्यावेळी आम्हाला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व जात पडताळणी समितीकडेही तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मी धर्म आणि जातीची लढाई लढत नाहीय त्याने फर्जीवाडा केला. दलित तरुणांचा अधिकार हिरावून घेतला त्याविरोधात लढाई आहे असे सांगतानाच हलदर तुम्ही कधी पदावर आलात हे माहीत नाही परंतु ज्या पदावर बसला आहात त्या पदाची गरीमा बदनाम करु नका अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.