‘लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी घालून दिलाय’

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला होता. तर निलेश राणे आणि नितेश राणे या राणे बंधुंनीही राऊतांचा जोरदार टोले लगावले आहेत.

भाजपच्या या नेत्यांना उत्तर देताना संजय राऊत यांनी चालू पत्रकार परिषदेत शिवी दिल्याने यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. चू*यागिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना शिव्या दिल्या. लाईव्ह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेसमोर आणि महिलांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आलीये..जी घराघरात पोहोचली. लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी घालून दिलाय. सर्व चॅनेलवर LIVE प्रक्षेपण झालेली त्यांची पत्रकार परिषद पुरावा मानून शिवीगाळ केल्या प्रकरणी संजय राऊत जी यांच्यावर कारवाई करावी.’ असा घणाघात चित्र वाघ यांनी केला आहे.