या राज्य सरकारने फक्त शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

या तोकड्या मदतीवरून आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलच फैलावर घेतलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली. ही मदत तुटपुंजी असल्याची टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असं ते म्हणाले. राज्य सरकारने जिरायती भागासाठी 10 हजार प्रति हेक्‍टर व बागायती भागासाठी 15 हजार रुपये प्रतिहेक्‍टर रुपये मदत जाहीर केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत. त्यात पुढील दोन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका पाटील यांनी केली. यावेळी राज्य सरकारने या मदतीवर पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हे देखील पहा