फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणाल्या, आनंद आहे!

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. औरंगाबादमध्ये ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.